बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार ठरला?
संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना ठाकरेंची सुन देणार आव्हान, ठाकरे सुळे लढतीत कोणाची सरशी?
बारामती दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचबरोबर पक्षाकडून सुद्धा उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. भाजपाने यंदा काहीही करुन बारामती लोकसभा मतदारसंघात आपला झेंडा फडकवण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी भाजपाकडून ठाकरे घराण्याच्या सूनबाईला उमेदवारी देण्याची चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे ठाकरे विरूद्ध सुळे अशी लढत होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांच्याकडे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अंकिता पाटील यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. सुरुवातीला बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. पण अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याने समीकरणे बदलली आहेत. त्यातच अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय संघर्ष सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार पूर्ण ताकत लावतील की नाही? अशी शंका भाजपाला आहे. त्यामुळे भाजपा इथून कोणतीही जोखीम पत्कारू शकत नाही. त्यामुळेच भाजपा अंकिता पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.वअंकिता पाटील या देशपातळीवर कार्यरत असलेल्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सदस्यही आहेत. त्यामुळे त्यांना देश पातळीवरील माहिती आहे. त्याचबरोबर अंकिता यांनी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी-बावडा गटातून काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी विजय मिळविला होता. प्रभावी जनसंपर्क आणि महिला प्रश्नावर सातत्याने त्या मांडत असलेली प्रभावी मतमांडणी यामुळे अंकिता पाटील ठाकरे राज्यातही सुपरिचित झाल्या आहेत. दरम्यान अंकिता पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आदी भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही दिली आहे. महिला आरक्षणासाठी आपली कटिबद्धता सिद्ध करण्यासाठी अंकिता पाटील यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघातील लढत रंगतदार होणार अशी अटकळ बांधली जात आहे.
अंकिता या ठाकरे घराण्याची सून आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी अंकिता यांचा विवाह झाला आहे. युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने अंकिता पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत त्या उतरणार का, हे पहावे लागणार आहे.