फडणवीसांच्या होमपीच वर भाजपाला पराभवाचा झटका
भाजपाच्या गाणारांचा पराभव करत आडबालेंनी फडकवला विजयी झेंडा
नागपूर दि २(प्रतिनिधी)- विधान परिषद निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. फडणवीसांच्या होम ग्राउंडवर म्हणजे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला आहे. हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपासाठी मोठा धक्का आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये २२ उमेदवार रिंगणार होते. येथे सरासरी ८७.२६ टक्के मतदान झाले होते. भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांच्याच प्रमुख लढत होती. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या होम पीचवरच महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांना पराभूत केले आहे. परंतु अमरावती, औरंगाबाद येथे भाजप पराभवाच्या छायेत आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले होते. या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. शिंदे गट – भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असून या निकालांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या दोन्ही बाजूंनी एक एक जागा जिंकण्यात आली आहे.