Latest Marathi News
Ganesh J GIF

बंदूक चेक करण्याच्या नादात पोटात झाडल्या गोळ्या; सांगलीत घडली थरकाप उडवणारी घटना!

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. अंकली फाटा परिसरात गावठी पिस्तुलची चाचणी घेत असताना अचानक गोळी सुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

जखमी तरुणाचे नाव अदित्यकुमार अशोक नाईक (वय २८, रा. मिरज) असे असून तो व्यवसायाने प्लॉट एजंट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अदित्यकुमार आणि त्याचा मित्र शिवतेज सुहास सावंत यांना स्वसंरक्षणासाठी गावठी पिस्तुल खरेदी करायचे होते. यासाठी त्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार समर्थ संजय गायकवाड याच्याशी संपर्क साधला होता.रविवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास समर्थ गायकवाड आणि त्याचा साथीदार सुजल भोसले हे पिस्तुलची विक्री करण्यासाठी अंकली फाटा येथील विठ्ठल पाटील कॉलेजसमोर आले.

अदित्यकुमार आणि शिवतेज हे त्यांच्या चारचाकी गाडीतून आले होते. व्यवहारापूर्वी पिस्तुल चालू आहे की नाही हे पाहण्यासाठी आरोपी समर्थ गायकवाड हा गाडीच्या मागच्या सीटवर बसला. त्याने पिस्तुल लोड करून त्याची ‘ट्रायल’ घेण्यास सुरुवात केली असता, अचानक दोन राऊंड फायर झाले. यातील गोळ्या पुढच्या सीटच्या आरपार जाऊन थेट चालक सीटवर बसलेल्या अदित्यकुमारच्या पोटात घुसल्या.

मोक्कातील गुन्हेगार अटकेत

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास करत पिस्तुल पुरवणारा मुख्य आरोपी समर्थ संजय गायकवाड आणि जखमीचा मित्र शिवतेज सुहास सावंत या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.मुख्य आरोपी समर्थ गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. तो सध्या जामिनावर बाहेर होता.या प्रकरणातील दुसरा आरोपी सुजल भोसले हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलीस तपास सुरू

जखमी अदित्यकुमारवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार विष्णू काळे यांनी फिर्याद दिली आहे. या सर्व बाबींचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!