Latest Marathi News
Ganesh J GIF

विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी

निर्णय मागे घेण्याची खा. सुळेंची मागणी

पुणे दि १३(प्रतिनिधी)- विधवा महिलांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले आहे.

लोढा यांनी काल (दि.१२) महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलेले व समाजमाध्यमांवर तसेच माध्यमांमध्ये व्हायरल झालेले पत्र आपण वाचले. यानुसार राज्य सरकार राज्यातील विधवा महिलांसाठी ‘गंगा भागिरथी’ असा शब्दप्रयोग करण्याबाबत विचार करीत असल्याचे समजले. हे अतिशय वेदनादायी आहे, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी व क्रांतीज्योती सावित्रीमाई अशा कर्तुत्ववान महिलांनी महाराष्ट्राची जडणघडण केली आहे.
फुले-शाहू-आंबेडकर-साने-कर्वे यांच्या प्रागतिक विचारांचा हा महाराष्ट्र आहे, याची आठवण करून देत खासदार सुळे यांनी हा निर्णय घाई घाईत घेतला गेल्याचे म्हटले आहे. पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, आपण जो काही वेगळा विचार करीत आहात, हा घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो, असे त्यांनी नमूद केले आहे.

महिलांच्या बाबतीतील हा अतिशय संवेदनशील विषय हाताळत असताना व त्यासंबंधी मोठा निर्णय घेत असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन व त्यांच्यासोबत विचार विनिमय करून आपण निर्णय घेतला पाहिजे, असे सांगत ‘गंगा भागीरथी’ या शब्दप्रयोगाबाबतचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!