Latest Marathi News
Ganesh J GIF

आधी जीव घेतला अन् नंतर नराधमाने केला अत्याचार; पोलीस तपासात विकृतीचा भयानक प्रकार उघड

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक अत्यंत चीड आणणारी आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पिंपळवंडी येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात आता तपासादरम्यान मन हेलावून टाकणारी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. नराधमाने आधी चिमुकलीचा जीव घेतला आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

उसाच्या शेतात नेऊन क्रूर कृत्य

चौथीत शिकणारी ही चिमुकली आजारी असल्याने मंगळवारी शाळेत गेली नव्हती. दुपारी पालक घराबाहेर पडल्याची संधी साधत शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय नराधमाने तिला सायकलवरून गावाबाहेर उसाच्या शेतात नेले. चिमुकलीने आरडाओरड करू नये म्हणून आरोपीने प्रथम तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला. हे क्रूर कृत्य केल्यानंतर त्याने चिमुकलीला पाण्याच्या ओढ्यात फेकून दिले.

गुन्हा झाकण्यासाठी शोधकार्यात सहभाग

कौटुंबिक पाश्वभूमी अत्यंत गरीब असलेला आणि पालावर राहणारा हा आरोपी मोबाईलही वापरत नव्हता. कृत्य केल्यानंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून तो चक्क पोलिसांसोबत चिमुकलीचा शोध घेण्याचे नाटक करत होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक आणि चौकशीच्या जोरावर त्याचा बनाव उघड करत त्याला बेड्या ठोकल्या.

परिसरात तीव्र संताप; पालकांची एन्काऊंटरची मागणी

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरन्सिक टीमने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

या घटनेनंतर संपूर्ण जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले असले, तरी “नराधमाला केवळ फाशी न देता गोळ्या घालून त्याचा एन्काऊंटर करा,” अशी संतप्त आणि आक्रमक मागणी पीडितेच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!