सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून या महिला नेत्याला संधी?
भाजपाकडून काँग्रेस आपला बालेकिल्ला परत मिळवणार? भाजपासमोर आव्हान, यांची भूमिका निर्णायक?
सोलापूर दि १९(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला आता काहीच महिने उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. त्यातच सोलापूरात माझा राजकीय काळ संपला, यापुढे निवडणूक लढविणार नाही असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी आपली राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता काँग्रेसने त्याठिकाणी आपला उमेदवार जवळपास निश्चित केला असल्याची चर्चा आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा गड होता. पण २०१४ पासून त्यावर भाजपाने कब्जा केला आहे. खुद्द सुशिलकुमार शिंदे यांना देखील तिथे पराभव पत्कारावा लागला होता. पण आता त्या ठिकाणी आता आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी द्यावी, अशी जनतेची इच्छा आहे. असे मी हायकमांडशी बोलणार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी आपण निवडणुक लढवणार नाही हे नक्की असून आपण निर्णय बदलणार नसल्याचे शिंदे म्हणाले आहेत. आमदार प्रणिती शिंदे या योग्य उमेदवार आहेत. त्यांची वैचारिक भूमिका ठोस असून, सर्वधर्मसमभावाची भूमिका घेऊन त्या वाटचाल करीत आहेत. प्रणिती शिंदे यांना राष्ट्रीय राजकारणाबाबत चांगली समज आहे. संसदेत पॉवरफुल पद्धतीने आपली भूमिका मांडण्याची योग्यता प्रणिती शिंदे यांच्यामध्ये नक्कीच आहे, असेही शिंदे म्हणाले आहेत. माझी लोकं आणि त्यांचा आनंद ही माझी मोठी जबाबदारी आहे. तसेच, काँग्रेस पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडेन, असे सांगून आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेची आगामी निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पण उमेदवार बदलल्यानंतर काँग्रेस आपली गमावलेली जागा परत जिंकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसने आद्याप आपला निर्णय जाहीर केला नसून, त्यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी अशी तिरंगी लढत येथे झाली होती. या निवडणुकीत भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी विजयी झाले होते. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांमुळे सुशिलकुमार शिंदे सलग दुस-यावेळी पराभूत झाले होते.