
छत्रपती संभाजीनगर हादरलं!; वाळूजमध्ये डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांनीही गमावला जीव
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. खवड्या डोंगरावर घडलेल्या एका भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये आई, वडील आणि त्यांच्या तरुण मुलाचा समावेश आहे.

मुलाला वाचवायला गेले अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल मुरलीधर चांदवडे हा तरुण नैराश्यातून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने वाळूज येथील खवड्या डोंगरावर गेला होता. मुलगा डोंगराच्या टोकावर उभा असल्याचे समजताच त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदवडे यांनी तातडीने डोंगरावर धाव घेतली. डोंगराच्या कड्यावर मुलाला मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतानाच, अचानक वडिलांचा धक्का लागून मुलगा आणि वडील हे दोघेही समतोल सुटून खोल दरीत कोसळले.

डोळ्यांसमोर पती आणि मुलाला कोसळताना पाहून आईने मारली उडी
या घटनेदरम्यान कुणालची आई संगीता चांदवडे या देखील त्यांच्या पाठोपाठ डोंगरावर पोहोचल्या होत्या. मात्र, आपल्या डोळ्यांदेखत पोटचा मुलगा आणि पती डोंगरावरून खाली कोसळल्याचे पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. हे असह्य दुःख सहन न झाल्याने त्यांनीही त्याच क्षणी कड्यावरून खाली दरीत उडी घेतली. या भीषण दुर्घटनेत कुणाल चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे या तिघांचाही जागीच अंत झाला.
पोलीस आणि नागरिकांच्या डोळ्यांदेखत घडला थरार
मुलगा डोंगरावर आत्महत्या करण्यासाठी गेल्याची बातमी मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक त्याला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. पोलीस त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतानाच ही दुर्दैवी साखळी घडली आणि काही क्षणांतच संपूर्ण कुटुंब संपले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने नागरिक सुन्न झाले आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.

