‘अजित पवार यांच्या शपथविधीची मुख्यमंत्री शिंदेना माहिती नव्हती’
शिंदे गटातील आमदाराचा धक्कादायक गाैप्यस्फोट, शिंदे गटात बंडखोरी? सरकार कोसळणार
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- शिवसेनेविरोधात बंड करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारमध्ये सहभागी झालेले शिंदे गटाचे आमदार १७ जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर ठाम आहेत. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाची कोंडी झाली आहे. त्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा आता दिल्ली दरबारी सोडवला जाणार आहे. त्या ठिकाणी काय तोडगा निघणार याची उत्सुकता असणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अजित पवार गटालाही त्याआधीच खाते वाटप करावे लागणार आहे. शिंदे गट अजित पवारांच्या समावेशामुळे आक्रमक झाला आहे. कारण त्यांच्या वाट्याला येणारी मंत्रीपदे आपोआप कमी झाले आहेत. त्यामुळे आता मंत्रिपद मिळविण्यासाठी जास्तीत जास्त दबाव आणणाऱ्या शिंदे गटातील आमदारांमध्ये भरत गोगावले आणि संजय शिरसाट हे आघाडीवर आहेत. याशिवाय शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे सरकारमधील मंत्रिपद सोडलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचीही मंत्रिपदाची मागणी आहे. त्याचवेळी शिंदे गटातील आमदारांनी चार मुद्दे मांडले आहेत. आधी शिंदे गटातील सात आमदारांना मंत्री करावे. दुसरे म्हणजे, अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये. तिसरे म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रिपद देऊ नये. चौथे, शिंदे गटाच्या मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री करावे त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना संधी देऊ नये. दरम्यान राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी विस्तार अजूनही झालेला नाही. शिंदे गट आधीच नाराज आहे त्यात अजित पवारांचा गट दाखल झाल्याने कोणाला कोणते खाते द्यायचे, यासाठी मोठीच कसरत करावी लागत आहे.
शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार गटाच्या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी दिली गेली असावी. त्यामुळेच आमच्या शपथविधीचा विचार झाला नसावा असा गाैप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्याचबरोबर राज्यातील सध्याचे सरकार मजबूत असले तरी ते कधीही कोसळू शकते, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.