काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसमोर मोठे आव्हान
पक्षाला उभारी देण्यासाठी खर्गेंची बेस्ट फाईव्ह प्लॅन समोर, अशी असणार रणनिती
दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- काँग्रेसला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रुपाने २४ वर्षात पहिला गैर-गांधी अध्यक्ष मिळाला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, खर्गे यांचा मार्ग सोपा नाही, कारण गेल्या काही वर्षात पक्षाचा बहुतांश निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे.त्यामुळे पक्षाला उभारी देण्याचे काम त्यांना मुळापासून करावे लागणार आहे.
खर्गे यांना पक्षात पाच गोष्टींवर काम करावे लागणार आहे.तरच काँग्रेसला उर्जितावस्था मिळू शकणार आहे.सध्याच्या राजकीय स्थितीत आपण नेहरू किंवा गांधी कुटुंबाकडून नियंत्रित केले जात नाहीत, असा स्पष्ट संदेश खरगे यांना लोकांमध्ये द्यावा लागेल. त्याचबरोबर भाजपाचा सामना करण्यासाठी देशातील विरोधी पक्षाची मोट बांधावी लागणार आहे. यासाठी संबंधित पक्षातील मतभेद मिटवून विरोधकांमध्ये एकजूट निर्माण करण्याचं आव्हान खरगे यांच्यासमोर असणार आहे. काँग्रेस संघटनेला सततच्या पराभवामुळे मरगळ आली आहे.यासाठी पक्षाअंतर्गत मोठे बदल गरजेचे आहेत. पण यासाठी अनेक जुन्या नेत्यांना पदावरून हटवावे लागणार आहे. ते धैर्य खर्गेंना दाखवावे लागणार आहे.पक्षातील हायकमांड नेते यांचा जनतेतला वावर कमी झाला आहे. त्यामुळे खर्गेंना जनतेतील नेत्यांना वरती आणण्याबरोबरच जुन्या नव्यांची मोट बांधणार आहे. हे बदल त्यांना २०२४ च्या निवडणुकाआधी करावे लागणार आहेत.अन्यथा पुन्हा काँग्रेसला पराभवच पहावा लागणार आहे.

काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. या पक्षाला मोठा राजकीय इतिहास आहे. पण मागच्या काही वर्षांत काँग्रेसची झालेली अवस्था केविलवानी आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षाला काँग्रेसच्या जुन्या इतिहासात न ररमतामतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नावीन्यपूर्ण काम करावे लागणार आहे.यासाठी मोठे बदल गरजेचे आहेत.