
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- गेल्या तीन चार महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना कोणाची यावरून पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची पळवापळवी होत आहे. पण यात भाजपाने आपला हेतु साध्य करत शिवसेनेबरोबर शिंदे गटालाही जोरदार धक्का दिला आहे.
भाजपाने पद्धतशीरपणे एकनाथ शिंदेना धक्का दिला आहे. पालघरमध्ये शिवसेनेच्या २ माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे प्रवेश केलेले माजी आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवाय भाजपाकडून त्यांना मोठे आश्वासन मिळाले असल्याची चर्चा आहे. पालघरचे शिवसेना माजी आमदार अमित घोडा आणि विलास तरे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. या दोन्ही आमदारांनी पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवली होती. विलास तरे हे २ वेळा बहुजन विकास आघाडीकडून आमदार होते. २०१९ मध्ये तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे तरेंचा पराभव झाला होता. शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनीही भाजपात प्रवेश करत धक्का दिला आहे. २०१६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. २०१९ विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. हे माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा अंदाज होता पण त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
मित्रपक्ष म्हणत भाजपाने शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली असताना स्थानिक पदाधिकारी आणि माजी आमदारांची पळवापळवी सुरु आहे. शिवसेना आमचीच हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी महत्वाचा आहे.यामुळे आगामी काळात संघर्ष होण्याची शक्यता आहे.