Latest Marathi News
Ganesh J GIF

रोजचा छळ, नोकरीला बंदी अन् नैराश्य; बारामतीत पत्नीने का रचला नवऱ्याला जिवंत गाडण्याचा कट?

पुण्याच्या बारामती शहरातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका उच्चशिक्षित पत्नीने तिच्या नवऱ्याला घरातच जिवंत गाडण्याचा भयानक कट रचला. सुदैवाने एका मजुराच्या सतर्कतेमुळे पोलिसांना वेळीच माहिती मिळाली आणि पतीचा जीव वाचला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

नेमकी घटना काय घडली?

बारामतीतील एका उच्चभ्रू वस्तीमधील फ्लॅटमध्ये प्रवीण जगताप आणि त्यांची पत्नी शर्मिला जगताप राहत होते. गेल्या काही काळापासून या दोघांमध्ये सातत्याने वाद सुरू होते. या वादातूनच शर्मिलाने पतीचा काटा काढण्यासाठी एक खळबळजनक कट रचला. शर्मिलाने बाल्कनीत बगीचा (गार्डन) तयार करण्याच्या बहाण्याने मातीचा एक चौकोनी कट्टा बनवला होता. तिने आधी पती प्रवीणला औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने जबर हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असावा असा गैरसमज शर्मिलाचा झाला. तिने बेशुद्ध पतीला बाल्कनीतील कट्ट्यात ठेवले आणि त्यावर माती टाकून बुजवून टाकले.

मजुराची सतर्कता आणि पोलिसांची धाड

पतीला कट्ट्यात टाकल्यानंतर शर्मिलाने त्यावर लगेचच टायल्स (Tiles) बसवून तो पक्का करण्यासाठी एका मजुराला बोलावले. मात्र, काम करताना मजुराला तिथे काहीतरी संशयास्पद वाटले. त्याने कोणताही उशीर न करता तात्काळ बारामती पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बाल्कनीतील कट्टा खोदून पाहिला असता त्यात प्रवीण बेशुद्ध अवस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

“मला मोलकरणीसारखं ठेवलेलं…” – पोलीस चौकशीत पत्नीचा धक्कादायक खुलासा

अटक केल्यानंतर आरोपी पत्नी शर्मिला जगताप हिने पोलीस चौकशीत अनेक हादरवणारे खुलासे केले आहेत. मी बी.फार्मसीचे शिक्षण घेतले आहे, तरीही नवरा मला नोकरी करायला बाहेर जाऊ देत नव्हता. मला घरात एखाद्या मोलकरणीसारखे बनवून ठेवले होते. तो मला आणि मुलांना रोज मारहाण करायचा. त्याच्या या रोजच्या छळाला कंटाळून मी टोकाचे पाऊल उचलले,” असा आरोप शर्मिलाने चौकशीदरम्यान केला आहे.

परिसरात खळबळ

या घटनेमुळे बारामती परिसरातील नागरिक सुन्न झाले असून उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून आरोपी महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!