दीपाली सय्यद यांचा शिंदे गटातील प्रवेशाला भाजपाचा खोडा
भाजपाकडून विरोधाचे कारण समोर, शिंदे गटावर भाजपाची दादागिरी?
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पण रश्मी ठाकरेंवर टिका करत शिंदे गटाची वाट पळालेल्या दिपाली सय्यद यांच्या वाटेत भाजपाने खोडा घातला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत टीका केली होती. हा दावा करत भाजपाने सय्यद यांना विरोध केला आहे.
दीपाली सय्यद यांना शिंदे गटात घेण्यास भाजपच्या काही नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. आधी दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपची माफी मागावी. त्यानंतरच दीपाली सय्यद यांना शिंदे गटात प्रवेश दिला जावा, अशी अट भाजप महिला आघाडीच्या वतीने घालण्यात आली आहे. भाजप महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी सय्यद यांचा प्रवेशाला विरोध करताना आपली भूमिका मांडली आहे त्या म्हणाल्या की, “मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तींना शिंदे गटात खरंतर प्रवेश देताच कामा नये. आम्ही महिला आघाडीच्यावतीने दीपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाचा जाहीर विरोध करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांचा आदर करतात. पण कोणतीही विचारधारा नसलेल्या, आपली मतं सातत्याने बदलणाऱ्या तसेच कुठलीही पात्रता नसलेली दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजले. मविआ सरकारच्या काळात दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यं केली होती. आमच्या दोन्ही नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या दीपाली सय्यद यांना आमचा विरोध आहे अशी भुमिका पेंडसे यांनी मांडली आहे. आता एकनाथ शिंदे भाजपासमोर नमते घेणार की सय्यद यांना पक्षात प्रवेश देणार हे पहावे लागेल.
दिपाली सय्यद यांनी मोदी मसणात जा अमित शाहा मसणात जा, महागाई आटोक्यात आणता येत नसेल ना तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या, असं वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केले होते. तसेच किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर ती गाडी मोदींची जरी असती तरी गाडीवर चप्पल आणि दगड पडलेच असते, कारण शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे अशा शब्दात दिपाली सय्यद यांनी भाजपावर तोंडसुख घेतले होते.