नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
'या' नेत्यांची पटोलेंविरोधात हायकमांडकडे तक्रार, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 'या' नेत्याला पसंती
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीपासून सुरु झालेला काँग्रेसमधील सावळा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यात नाना पटोले यांच्याविरोधात पक्षातील असंतोष समोर येत असून आता काँग्रेस हायकमांडकडे थेट नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली असुन प्रदेशाध्यक्ष पदासाठी एका नेत्याचे नाव सुचवण्याग आल्यामुळे पक्षातील गटबाजी समोर आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरील अडचणी काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी पक्षातील २१ नेत्यांनी पक्षाचे निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेत नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पटोलेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याने त्यांची हकालपट्टी केली जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती पण आता प्रदेश काँग्रेसचे सचिव खान नायडू, प्रदेश काँग्रेसचे सदस्य प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंग सलूजा, इक्राम हुसैन यांच्यासह २१ नेत्यांनी पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले यांची पक्षात मनमानी सुरू आहे. त्यांच्यामुळे पक्षात गटबाजीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी करत या नेत्यांनी आदिवासी नेते शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विदर्भातूनच नाना पटोले यांच्या प्रदेश अध्यक्षपदाला सुरुवातीला विरोध झाला. आशिष देशमुख यांनी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष बदलवा, अशी मागणी केली होती. नाशिक पदवीधर निवडणूक प्रकरणातही सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर निशाना साधला होता. अशा परिस्थितीत आता रमेश चेन्निथला याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.