Latest Marathi News
Ganesh J GIF

धोनी इज बॅक! ६ सामन्यांनंतर ‘माही’चं कमबॅक? वानखेडेवर रंगणार आयपीएल २०२६ मधील सर्वात मोठा थरार

आयपीएल २०२६ मध्ये आज (२३ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर महामुकाबला खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा खेळला जाणार असून सामन्याआधी मोठा प्रश्न एकच की एमएस धोनी मैदानात परतणार का?धोनीच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय सामन्याच्या दिवशी नाणेफेकीच्या अगदी काही क्षणाआधी घेतला जाईल. अंतिम ११ मध्ये त्याच्या नावाची अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही, मात्र लवकरच तो मैदानावर पुनरागमन करेल असे संकेत मिळत आहेत. त्याने वानखेडेवर झालेल्या संघाच्या सराव सत्रात भाग घेतला होता. तसेच त्यामध्ये त्याने जवळपास ४० मिनिटे फलंदाजी आणि विकेटकिपिंगचा सरावही केला होता. पूर्ण सराव सत्रादरम्यान तो उपस्थित होता. त्यामुळे सीएसकेसाठी काही आशा निर्माण झाल्या आहेत.

सीएसकेचे गोलंदाजी सल्लागार एरिक सायमन यांनी सांगितले की, जर ते आणि मेडिकल स्टाफ दोघेही धोनीच्या फिटनेसबद्दल पूर्णपणे समाधानी असतील, तेव्हाच तो खेळणार. सध्या धोनी पोटरीच्या दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळेच तो सुरूवातीच्या सहा सामन्यांना मुकला होता. त्याचबरोबर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानेही धोनी ‘हळूहळू आणि स्थिरपणे’ पूर्ण तंदुरुस्ती परत मिळवत आहे.ऋतुराज म्हणाला, “आम्ही सराव सामना खेळत होतो, तेव्हा धोनीला दुखापत झाली होती. त्यातून तो सावरत आहे. तो पुढच्या किंवा त्यानंतर नक्कीच संघात परत येणार.”

धोनी जरी संघात परतला तरी तो एक ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून खेळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संघाला त्याच्या फिटनेसचे नीट व्यवस्थापन करता येईल. त्याच्या अनुपस्थितीत सध्या संजू सॅमसन विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळत आहे. संघाची सद्यस्थिती पाहता धोनीचे लवकर परतणे अत्यावश्यक आहे. सीएसकेने आतापर्यंत आयपीएलच्या या १९ व्या हंगामात ६ सामने खेळले असून केवळ २ सामने जिंकले आहेत, तर ४ सामने गमावले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!