Latest Marathi News
Ganesh J GIF

दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का?

जनतेच्या प्रश्नावर राज्य सरकार आंधळे व बहिरे, मणिपूरच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत म्हणून तर दोन दिवस सभागृहाचे कामकाज बंद ठेवले नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याची शंका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवार व मंगळवार या दोन दिवसात कामकाज होणार नसून त्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय का घेतला याचे सविस्तर उत्तर मात्र दिलेले नाही. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन पुर्णवेळ व ठरलेल्या कार्यक्रमानुसार व्हावे अशी काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी केलेली आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट उभे ठाकलेले आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत पण या सरकारला जनतेच्या प्रश्नांची चिंता नसून दिल्लीतून येणाऱ्या ‘आका’ची जास्त चिंता आहे. नागपुरात एकाच दिवशी दिवसाढवळ्या चार लोकांची हत्या करण्यात आली, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरचेच आहेत. नागपूर शहरात कायदा सुव्यवस्थेची ही स्थिती आहे तर राज्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सरकार तरुणांना नोकऱ्या देत नाही आणि दुसरीकडे ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून तरुणांना बरबाद केले जात आहे. देशातील सर्वात महाग वीज महाराष्ट्रात आहे. सत्तेत बसलेले लोक फक्त मलाई खाण्यावर लक्ष देत आहेत. राज्यातील जनतेच्या मुळ प्रश्नावर हे सरकार आंधळे, बहिरे आहे. या सरकारचे डोळे उघडण्यासाठी मविआच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

मणिपूरमधील घटनांमुळे देशाला कलंक लागला आहे. भारतात लोक सुरक्षित नाहीत असा संदेश जगभरात गेला आहे, त्याची जबाबदारी मोदी सरकारकडे जाते पण नरेंद्र मोदी व भाजपा केवळ इव्हेंटबाजीत मग्न आहे. टीव्हीवर पेपरमध्ये आपला फोटा कसा येईल याचीच त्यांना जास्त चिंता असते. मणिपूरमधील महिला अत्याचाराची चौकशी सीबीआय करणार असल्याचे समजते पण सीबीआय चौकशीतून काय होणार ? सीबीआय पुलवामा घटनेचीही चौकशी करत आहे, त्याचा अद्याप अहवाल आला का ? या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, त्यांचे काम कसे चालते हे सर्वांना माहित आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!