
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरण अद्याप ताजे असतानाच, आता पुणे शहरातून मद्यधुंद चालकाचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. पुणे शहरात रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मद्यपी कारचालकाने धक्काबुक्की केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे आणि पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ज्वल सोमनाथ म्हस्के (वय २७, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. पानमंद वस्ती, म्हस्केवाडी, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रशांत नायडू यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कारचालक प्रज्ज्वल म्हस्के हा मुंढव्यातील रेल्वे उड्डाणपुलावरून कार घेऊन जात होता. लोणकर वजनकाट्याजवळ त्याच्या भरधाव कारने एका ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच रात्रपाळीदरम्यान गस्त घालत असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत नायडू हे तातडीने घटनास्थळी मदतीसाठी पोहोचले.

पोलिसांना शिवीगाळ करत मोबाईल आपटला!
पोलीस कर्मचारी प्रशांत नायडू तेथे पोहोचले असता, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालक म्हस्के याने त्यांना पाहताच थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता तो म्हणाला, “तुम्ही पोलीस विकले गेले आहात. बलात्कार होतो, तुम्ही तेथे जात नाहीत आणि आम्हाला त्रास देता!”असा वाद घालत त्याने पोलीस कर्मचारी नायडू यांना थेट धक्काबुक्की केली. संतापाच्या भरात त्याने नायडू यांच्या हातातील शासकीय मोबाईल हिसकावून घेतला आणि तो जमिनीवर जोरात आपटून फोडला.
आरोपीला पोलिसांची नोटीस
या राड्यानंतर पोलिसांनी तातडीने कारचालक प्रज्ज्वल म्हस्के याला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. मुंढवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की करणे आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरवसे करत आहेत.

