दिवाळीला गावी जातात? मग ही बातमी तुम्हाला वाचावीच लागेल
एसटीचे कर्मचारी या दिवसापासून संपावर, प्रवाशांचे होणार हाल, या मागण्यांसाठी संपाची हाक, सरकार अडचणीत
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण आंदोलन काळात एसटी सेवा बंद असल्याचा फटका प्रवाशांना बसला होता. पण आता ऐन दिवाळी सणात प्रवाशांचे हाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे सरकार पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एसटीचा संप आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघ उद्यापासून म्हणजेच ६ नोव्हेंबरपासून संप पुकारणार आहे. सातवा वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी हा संप असणार आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी सदावर्ते यांनी याचे नेतृत्व केले होते. आताही त्यांच्या नेतृत्वाखालीच संप करण्यात येणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८५ टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. या संपात ६८ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना ४८ टक्के महागाई भत्ता दिला आहे. परंतु अद्याप थकबाकी दिलेली नाही. ती लवकरात लवकर देण्यात यावी, अन्यथा सोमवारी सकाळपासून रस्त्यावर एकही एसटी धावणार नाही आणि त्या दिवसाचा पगार मात्र महामंडळाला कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल, असा थेट इशाराही गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या संपाला किती एसटी कर्मचारी पाठिंबा देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एसटी संपाची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडून देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ताबडतोड संवाद साधला जाणार आहे. दिवाळीच्या तोंडावर संपावर जाऊ नये म्हणून प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिली आहे.