
पुण्यात माजी नगरसेवकाच्या घरासमोर दुहेरी हत्याकांड
पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड, पोलीसांसमोर तपासाचे आव्हान
पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यात पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तलवार आणि पालघन सारख्या धारदार शस्त्राने वार करून दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे हत्याकांड मध्यरात्री ही थरारक घटना नगरसेवकाच्या घरासमोरच घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
येरवडा येथील पांडू लमाणवस्ती परिसरात शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास दोघांची हत्या करण्यात आली. अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर चव्हाण नावाच्या व्यक्तीबरोबर पूर्वीच्या वादातून सुभाष राठोड याचे वाद होते. त्याच कारणातून शनिवारी मध्यरात्री वाद झाला त्यावेळी चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी अनिल वाल्हेकर आणि सुभाष राठोड या दोघांना धारदार शास्त्राने मारहाण केली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. पुण्याच्या माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेरच हे हत्याकांड घडले आहे. ही घटना समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पहाटे घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा दाखल केला असून येरवडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातही हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचीही हत्या करण्यात आली होती. तर वडगाव शेरीत दिराने भावजयीचा खून केला होता. तर आता दुहेरी हत्याकांड झाल्याने पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.