
भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेमागचे धक्कादायक कारण समोर!; मूर्तिकाराचा सल्ला डावलल्याने २ अध्यक्षांचा बळी?
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबईत एक अत्यंत वेदनादायी आणि सुन्न करणारी दुर्घटना घडली. ‘भुलेश्वरचा राजा’ या २७ फूट उंच भव्य गणेशमूर्तीचे आगमन होत असताना क्रेनवरून मूर्ती अचानक कोसळली. या भीषण अपघातात भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन लहान मुलींसह पाच जण गंभीर जखमी झाले.

मूर्तिकाराच्या सूचनेकडे दुर्लक्ष आणि घाईगडबड

अपघाताच्या प्राथमिक तपासात आणि समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमागे मंडळाची निष्काळजी आणि घाई कारणीभूत ठरल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भायखळ्यातील मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी मूर्ती अजून पूर्ण सुकलेली नसून ओलसर असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच वेल्डिंगचे काम बाकी असल्याने १० दिवसांनंतरच मूर्ती नेण्याचा स्पष्ट सल्ला दिला होता.डेकोरेटरच्या वेळेचे गणित: इंदूरवरून येणाऱ्या डेकोरेटरच्या नियोजनानुसार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घाईघाईत अर्धवट सुकलेली मूर्ती कार्यशाळेतून बाहेर काढली.आगमनाच्या प्रवासातच मूर्तीच्या पाठीमागील वेल्डिंग सुटण्यास सुरुवात झाली होती. मंडपापासून अवघ्या ५० फुटांवर असताना वेल्डिंग पूर्णपणे तुटले आणि दोन टनाची ही भव्य मूर्ती थेट कार्यकर्त्यांवर कोसळली.

हृदयद्रावक शेवट
मूर्ती खाली कोसळत असताना संकेत आणि ब्रिजेश यांनी बाप्पाला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, २ टनांच्या प्लास्टरखाली दबल्याने संकेत यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर ब्रिजेश जोशी यांनी उपचारादरम्यान दम तोडला. रविवारी शोकाकूल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

