
सोशल मीडियावरील ‘स्टेटस’वरून झालेल्या वादातून एका अल्पवयीन बारावीतील विद्यार्थ्याचा डोक्यात हातोडी घालून निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोथरूड येथील प्रसिद्ध एआरएआय (ARAI) टेकडीवर घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा आणि ताब्यात घेण्यात आलेले अल्पवयीन आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे होते. मृत मुलगा बारावीत शिक्षण घेत होता, तर आरोपी कोथरूड परिसरातील एका वसाहतीत राहणारे आहेत.

नेमका वाद कशामुळे झाला?

काही दिवसांपूर्वी आरोपींपैकी एकाला एका टोळक्याने मारहाण केली होती. मारहाण करणारे संशयित सध्या कारागृहात आहेत. दरम्यान, कारागृहात असलेल्या आरोपींपैकी एकाचे छायाचित्र मृत मुलाने आपल्या सोशल मीडियाच्या ‘स्टेटस’वर ठेवले होते. यावरून आरोपी आणि मृत मुलामध्ये वैमनस्य निर्माण झाले होते.

घटना कशी घडली?
मृत मुलगा आपल्या दोन मित्रांसोबत मंगळवारी (१८ ऑगस्ट) राजगड परिसरातील एका मंदिरात दर्शनासाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर ते तिघे पहाटे कोथरूडमधील आरोपी राहत असलेल्या वसाहतीत आले. त्यानंतर मृत मुलगा आणि दोन्ही अल्पवयीन आरोपी एआरएआय टेकडीवर गेले. तेथे स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा तीव्र वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंसेत झाले आणि आरोपींनी त्याच्या डोक्यात हातोडीने वार करून त्याची हत्या केली.
पोलिसांची तातडीची कारवाई
बुधवारी सकाळी टेकडीवर फिरायला आलेल्या नागरिकांना एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाच्या खिशातील मोबाईलवरून त्याची ओळख पटवली.
“तपासादरम्यान अल्पवयीन आरोपींनीच हा खून केल्याचे समोर आले. पसार झालेल्या दोन्ही अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले असून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

