कोकण विधान परिषद निवडणूक भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
कोकणात महाविकास आघाडीला धक्का, ठाकरेंच्या गडाला भाजपचा सुरंग
मुंबई दि २(प्रतिनिधी)- कोकण शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत पहिल्यांदाच पहिल्याच फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजय झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव झाला आहे. हा महाविकास आघाडीसाठी धक्का आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजार ६४८ मते मिळाली तर बाळाराम पाटील यांना ९ हजार ७६८ मते मिळाली. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. नवी मुंबईतील नेरुळ येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ महेंद्र कल्याणकर हे काम पाहत होते. २८ टेबलवर मतमोजणी झाली. पाच जिल्ह्यातील शिक्षकांनी या निवडणुकीत ९१ टक्क्यांपर्यंत मतदान केलं होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर होते. यानंतर प्रतिक्रिया देताना म्हात्रे म्हणाले की, “हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षात मी जे काम केले, त्याची ही पोचपावती आहे. कोकण विभागातील शिक्षकांनी मला चांगला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझावर जो विश्वास टाकला, तो विश्वास आज सार्थकी लागला असे म्हणत त्यांना आनंद व्यक्त केला आहे. तर नितेश राणे यांनी म्हात्रेंचे अभिनंदन करत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
शेकापचे बाळाराम पाटील यांनी निवडणुकीत झालेला पराभव मान्य करत शिक्षकांनी दिलेला कौल आपण खुलेपणाने स्विकारतो असे म्हटले आहे.तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “आम्ही बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र, असा काही निकाल लागला असेल तर तो धक्का आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.