
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आता मिटणार की आगामी काळात आणखी एखादा मोठा राजकीय भूकंप होणार? हा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचं कारण म्हणजे अजित पवार गटाचे अत्यंत ज्येष्ठ आणि बडे नेते दिलीप वळसे पाटील यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’ हे निवासस्थान गाठून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या अनपेक्षित बैठकीचे फोटो समोर आले असून, राजकीय वर्तुळात या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि वळसे पाटील यांच्यात बराच वेळ खलबतं चालली. त्यामुळे या भेटीमागे नक्की काय शिजतंय, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

भेटीमागचं खरं कारण काय? वळसे पाटील यांच्या कार्यालयाचा खुलासा

एकीकडे या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगल्या असताना, दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाकडून तातडीने स्पष्टीकरण देऊन यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या भेटीला कोणताही राजकीय रंग नसल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाने केला आहे.

कार्यालयाच्या माहितीनुसार बैठकीतील मुख्य विषय
कांद्याचे प्रश्न: राज्यातील कांद्याचे गडगडलेले भाव आणि शेतकऱ्यांच्या समस्या.
सहकार क्षेत्र: महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सध्याचे विविध प्रश्न आणि अडचणी.
संस्थात्मक कामांचे दिले स्पष्टीकरण
दिलीप वळसे पाटील हे आजही ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ आणि ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ सारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये सक्रिय आहेत. शरद पवार हे या संस्थांचे अध्यक्ष असल्याने, कामाच्या आणि नियोजनाच्या निमित्ताने त्यांच्यात अशा बैठका नेहमीच होत असतात, असे वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
“जिव्हाळ्याचे संबंध, गैरसमज नको!” – अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
या अचानक झालेल्या भेटीवर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेेश पाटील यांनी देखील पक्षाची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, “आमच्या नेत्यांचे पवार साहेबांसोबत आजही कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ही भेट काही पहिल्यांदाच झालेली नाही, त्यामुळे यात राजकीय गैरसमज काढण्याचं काहीच कारण नाही.”
पण… राजकारणात जे दिसतं, तसं असतं का?
पक्षाकडून आणि वळसे पाटलांकडून याला सदिच्छा किंवा संस्थात्मक भेट म्हटले जात असले, तरी ‘राजकारणात जे दिसते, ते कधीच नसते’ असे मानले जाते. यापूर्वीही अजित पवार गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी वेळोवेळी शरद पवारांची गुप्त किंवा उघडपणे भेट घेतली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात झालेली ही दीर्घ चर्चा केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित होती की यामागे काही मोठी राजकीय खेळी सुरू आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

