
देशातील राज्यसभेच्या २४ रिक्त जागांसह दोन पोटनिवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. आगामी १८ जून रोजी या जागांसाठी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणीही पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडताना दिसत असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

नवनीत राणा राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यसभेवर? भेटीगाठींमुळे चर्चांना वेग

या पोटनिवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची. नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या भेटींमुळे वाढली राजकीय उत्सुकता
नवनीत राणा यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली होती.नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. या लागोपाठ झालेल्या महत्त्वाच्या भेटींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील जागा नवनीत राणा यांच्यासाठी सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘या’ नावांचीही जोरदार चर्चा
सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या जागेवर हक्क सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर अनेक नावांची चाचपणी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीकडून सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव यांच्या नावांचा विचार केला जात आहे. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून, त्यानंतरच उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ यांच्या नावाबाबत सस्पेन्स?
यापूर्वी ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे नावही राज्यसभेच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्ष नेतृत्व त्यांना तूर्तास दिल्लीच्या किंवा केंद्राच्या राजकारणात पाठवण्याबाबत फारसे उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे भुजबळांचे नाव मागे पडण्याची चिन्हे आहेत.

