एकनाथ शिंदेच्या गुवाहाटी दाै-याला नाराजीचे ग्रहण
शिंदेवर हे आमदार मंत्री नाराज, तर भाजपाची शिंदे गटावर गुवाहाटीत पाळत
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार सत्तेत येऊन आता पाच महिन्याहून अधिक काळ झाला आहे. पण सत्तेत असूनही आमदारांची नाराजी, मंत्रिमंडळ विस्तारावरुन वादावादी आणि भाजपाकडुन होत असलेला दबाव यामुळे एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला गुवाहाटीला रवाना झाले आहेत. पण इथेही नाराजीचे ग्रहण असून इथेही शिंदे गटावर भाजपाची पाळत असणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर सर्व काही सुरळीत पार पडू दे, यासाठी एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीला नवस केल्याची चर्चा आहे. हा नवस फेडण्यासाठीच एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला गेल्याचे सांगितले जाते. मात्र, शिंदे गटाच्या या गुवाहाटी दौऱ्याला पाच आमदार आणि एका खासदाराने दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामागे नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. दांडी मारलेल्या आमदारांमध्ये यामध्ये चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, महेंद्र दळवी आणि संजय गायकवाड आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. त्याचवेळी शिंदे गटासोबत भाजपचे दोन नेते गुवाहाटीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते फडणवीस यांच्या खास मर्जीतील आहेत. यापैकी एक म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण आणि दुसरे म्हणजे मोहित कंबोज. हे दोन नेते दुसरा सत्ताबदल नको म्हणून भाजपा शिंदे गटावर पाळत ठेवत असल्याची चर्चा रंगली आहे. रवींद्र चव्हाण आणि कंबोज यांनी सत्ताबदलात महत्वाची भूमिका पार पाडली होती. महत्वाचे खाते आणि न मिळालेले मंत्रिपद ही शिंदे गटातील नाराजीची कारणे आहेत. तर बांगर यांनी मात्र आपण मंत्रिपद मिळावे यासाठीच आपण गुवाहाटीला आल्याचे सांगितले आहे.
मतदारसंघातील पूर्वनियोजित कामांमुळे आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचे संबंधित आमदारांनी स्पष्ट केले आहे.मात्र आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपले स्थान बळकट व्हावे यासाठी हे नाराजीनाट्य रंगले आहे. हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. पण शिंदे आणि फडणवीस यांना मंत्रिपद देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्याची सुरूवात गुवाहाटी दाै-यापासून सुरु झाली आहे.