
एकनाथ शिंदेचा ठाकरेंसह महाविकास आघाडीला जोरदार दणका
मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या त्या पत्रावर राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय
मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द केल्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करत आणखी एक दणका दिला आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
ठाकरे सरकारने १२ नोव्हेंबर २०२०मध्ये एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे (राष्ट्रवादी), रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर (काँग्रेस ) तर शिवसेनेच्यावतीने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नावे असलेली यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र, राज्यपालांनी आजपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही.राज्यपाल भाजपाला अनुकूल असलेली भुमिका घेत यादी मंजूर करत नाहीत असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यानी केला होता. आता भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी मागे घेण्यात यावी, असे पत्र शिंदे सरकारने नुकतेच दिले होते. त्यामुळे ती यादी रद्द करण्यात आली आहे. या विरोधात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८, तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून या चार जागांवर मूळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागू शकतील, अशा चार जणांची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची याचा निकाल लागेपर्यंत संघर्ष होतच राहणार आहे.