ओडीसातील रेल्वे अपघाता आधीही भारतात झालेत मोठे रेल्वे अपघात
कधी आणि कुठे झालेत मोठे रेल्वे अपघात जाणून घ्या, १६ महिन्यानंतर ओडिशामध्ये मृत्यूचे तांडव
दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला. यात जवळपास तीनशे लोकांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. रेल्वेच्या डब्यांत अजूनही अनेक मृतदेह अडकल्याचे भिती व्यक्त केली जातीय. लष्कराकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. पण हा भारतातील पहिलाच रेल्वे अपघात नसून आजवर रेल्वे अपघातात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्याची माहिती जाणून घेऊया.
भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात ६ जुन १९८१ मध्ये झाला होता. बागमती नदी पूलावरुन जाताना सगळी ट्रेनच रुळावरुन कोसळल्याने हा अपघात घडला होता. यात ९०० प्रवाशांचे प्राण गेले होते. आणखी एक अपघात २० आॅगस्ट १९९५ साली झाला होता. फिरोजाबाद रेल्वे स्थानकाजवळ पुरुषोत्तम एक्सप्रेसने कालिंदी एक्सप्रेसला दिलेल्या धडकेमुळे ४०० जणांना आपला जीव गमावावा लागला होता. त्याचबरोबर २६ नोव्हेंबर १९९८ रोजी जम्मू तावी-सियालदह एक्सप्रेस खन्ना येथे फ्रंटियर गोल्डन टेंपल मेल धडकली. फ्रंटियर गोल्डन टेंपल मेल रुळावरुन डबे घसरल्याने आगोदरच अपघातग्रस्त झाली होती. त्यातच तावी-सियालदह एक्सप्रेसने धडक दिली. या अपघातात २१२ जणांना आपला जीव गमावावा लागला होता. हैद्राबादजवळील वेलीगोंडा येथे २९ ऑक्टोबर २००५ रोजी पुरामुळे पुल वाहून गेल्यामुळे झालेल्या अपघातात १३० जणांचा मृत्यू झाला होता. अलीकडच्या दहा वर्षातील मोठा अपघात हा २० नोव्हेंबर २०१६ मध्ये झाला होता. इंदुर पाटणा एक्सप्रेस कानपूरजवळ रुळावरुन घसरल्याने झालेल्या अपघातात १५० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर शेवटचा रेल्वे अपघात १३ जानेवारी २०२२ रोजी झाला होता. पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेसचे १२ डब्बे रुळावरुन घसरल्याने ९ जणांना आपले प्राण गमावावे लागले होते.
ओडीसातील रेल्वे अपघातबाबत पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये मदत जाहीर केली आहे. तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.