बार्शी तालुक्यातील पांगरीत शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट
आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू, मृताचा आकडा वाढण्याची शक्यता
बार्शी दि १(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ शिरोळा फायरवर्क्स या फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीत ४० कर्मचारी काम करत होते. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.अग्निशामक दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. आज दुपारच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. फटाक्याचा दारूगोळा असल्यामुळे आगीने लगेच पूर्ण फॅक्टरीवर पेट घेतला. या आगीत एक जेसीबीही जळून खाक झाला आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. मोठया प्रमाणात आग लागल्याने मयताची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी येत आहेत. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ही आग लागल्याने अनेकांच्या आनंदावर विरजन पडले आहे.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात येईल पण. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जण मयत झाले असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.