‘नव्या भारताच्या नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं’
मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला सवाल, त्या विधानावरुन उडवली खिल्ली
पटना दि १(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं विधान केलं होते. यावर बरीच टिका झाली होती. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत अमृता फडणवीसांवर निशाना साधला आहे.
नितीशकुमार म्हणाले की, माझे वडील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला. पण, त्यानंतर स्वातंत्र्यलढ्याची प्रत्येक गोष्ट मी समजून घेतली. भारताच्या स्वातंत्र्यातील महात्मा गांधींचं योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. पण आता हे म्हणत आहेत की, जुन्या राष्ट्रपितांना विसरून जा नवे राष्ट्रपिता आले आहेत. पण या नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं? त्यांनी काही काम केलंय का? त्यांच्या काळात भारत कोणत्या क्षेत्रात पुढे गेलाय? असा सवाल विचारत नितीश कुमार यांनी मोदींसह अमृता फडणवीसांना टोला लगावला आहे. नितीश कुमार पुढे म्हणाले, “भाजपा आणि संघाने केवळ नव्या तंत्रज्ञानाचा जबरदस्तीने वापर केला आहे. आधी माध्यमं सरकार असो की विरोधी पक्ष, त्यांच्यावर आपली मतं अगदी स्पष्टपणे मांडायचे. मात्र, आज माध्यमांना तेच लिहावं लागत आहे जे सांगितलं जात आहे. शिवाय आरएसएसला स्वातंत्र्य लढ्याशी काहीही देणंघेणं नव्हतं,” असा आरोपही नितीश कुमार यांनी केला आहे.
अमृता फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता असून महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं विधान केलं होतं. तसेच मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते असे म्हणत आपण बदललो असल्याचे सांगितले होते.