‘ठाकरे सरकार पाडण्यासाठी बंडाची सुरुवात फडणवीसांच्या आदेशाने’
शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्याचा गौप्यस्फोट, दोन वर्षात दीडशे बैठक घेतल्याचा दावा
धाराशिव दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडत भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केले. पण या बंडाबाबत मंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे. या बंडाच्या पाठीमागे भाजपचा हात असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत तानाजी सावंत यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, “बंडासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी तब्बल दीडशे बैठका केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात केली, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील आमदारांना बंडासाठी तयार करण्याचे कामही करत होतो. विशेष म्हणजे, मी या सगळ्या गोष्टी सांगून करत होतो कोणतीही गोष्ट कधी लपूनछपून केली नाही असा मोठा गाैप्यस्फोट सावंत यांनी केला. त्याचबरोबर तानाजी सावंत पुढे म्हणाले की, “२०१९ च्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला पाठींबा दिला, पण शरद पवारांनी मीठाचा खडा टाकला आणि आणि पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्येही मला स्थान देण्यात आले नाही. म्हणूनच मी मातोश्रीवर जाऊन ‘त्यांना’ सांगितले की मी पुन्हा मातोश्रीच्या पायऱ्याही चढणार नाही. ३० डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मला त्यापासूनही दूर ठेवण्यात आले. त्यामुळे मी संतप्त झालो आणि फडणवीसांच्या आदेशाने मी ३ जानेवारीला बंड केले आणि भाजपच्या मदतीने उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सत्तेवर आलो.” मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन ठाकरे सरकार पाडण्याचे कारस्थान दोन वर्षांपासून सुरू होते, हे स्पष्ट झाले आहे. आणि त्यासाठीचे भाजपाचे प्रयत्नही उघड झाले आहेत.
मंत्री सावंत यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांकडून भाजपवर जे आरोप होत होते ते खरे असल्याचे दिसून येत आहे. कारण, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात भाजपचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अद्याप यावर काही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत.