
पत्नी माहेरी राहायला गेल्याच्या रागातून एका दारुड्या पतीने सासरच्या घरी जाऊन धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संतापलेल्या पतीने केवळ पत्नीवर चाकूने वार केले नाहीत, तर दुसऱ्या दिवशी आपल्या आईला सोबत घेऊन सासरे आणि एका ७४ वर्षीय वृद्ध आजीवरही जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाह आणि छळ.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा २०१७ मध्ये सहजाद सलीम खान (रा. सर्वश्रीनगर) याच्याशी आंतरधर्मीय प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच सहजादला दारूचे व्यसन जडले. दारूच्या नशेत तो अनेकदा पत्नीला बेदम मारहाण करायचा. या सततच्या त्रासाला आणि घरगुती छळाला कंटाळून पीडित महिला काही काळापूर्वी आपल्या माहेरी राहायला गेली होती.

पहिल्या दिवशी चाकूने हल्ला
१७ मे रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी सहजाद सलीम खान दारूच्या नशेत धुंद होऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला. त्याने घराच्या दरवाजावर दगड मारून आरडाओरडा सुरू केला. दगडाचा आवाज ऐकून घरातले सर्व लोक बाहेर आले असता, सहजादने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग येऊन सहजादने जवळ असलेला चाकू काढून थेट आपल्या पत्नीवर वार केले. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली, त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला.

दुसऱ्या दिवशी आईला घेऊन पुन्हा धुडगूस
या घटनेचा थरार इथेच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सहजाद आपली आई फैमीदा बानो सलीम खान (५०) हिला सोबत घेऊन पुन्हा सासरच्या घरासमोर पोहोचला. दोघांनीही घरासमोर शिवीगाळ करत दरवाजावर दगडफेक सुरू केली.पीडित महिलेच्या ७४ वर्षीय वृद्ध आजीने दरवाजा उघडला असता, नराधम सहजादने आजीच्या पोटात जोरात लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्याने घरात घुसून पत्नीला केसांना धरून फरफटत बाहेर आणले आणि तिचे डोके बाहेर उभ्या असलेल्या ई-रिक्षावर जोराने आपटले.

वृद्ध आजीच्या डोक्यात घातला दगड
मुलीला वाचवण्यासाठी तिचे वडील धावून आले असता, सहजादने त्यांच्यावर लाकडी दांड्याने भीषण प्रहार केले. त्याने आजीलाही त्याच दांड्याने बेदम मारहाण सुरू केली. आजीने स्वतःचा बचाव करण्यासाठी जमिनीवर पडलेला एक मोठा दगड उचलला. मात्र, क्रूर सहजादने तो दगड आजीच्या हातातून हिसकावून थेट त्यांच्याच डोक्यात मारला. यात आजी रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्या.रात्रीच्या वेळी आरडाओरडा वाढल्याने वस्तीतील लोक घटनास्थळी जमा झाले. लोकांचा वाढता रोष पाहून आरोपी सहजाद खान आणि त्याची आई फैमीदा बानो दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हुडकेश्वर पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलीस कारवाई: पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सहजाद सलीम खान आणि त्याची आई फैमीदा बानो यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार प्राणघातक हल्ला आणि कौटुंबिक हिंसेचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

