सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही
वारकरी लाठीहल्ला प्रकरणी विरोधकांची विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही असा आरोप विधानसभेत विरोधकांनी केला आहे.
नुकसानीचा पंचनामा सर्वेही केलेला नाही. सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने सरसकट मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आज अधिवेशनातील चर्चेत भाग घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पावसामुळे लाखो होक्टर शेती पाण्याखाली गेली आहे तर लोकांच्या घरात पाणी शिरले आहे, अन्नधान्य वाया गेला आहे, लोक उपाशी आहेत. शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या डोळ्यातले अश्रु थांबत नाहीत. कृषीप्रधान राज्यात शेतकरी व गरिबांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. हा विषय राजकारण करण्याचा नाही, ज्यांचे- ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून भरीव मदत दिली पाहिजे. सरकार कोट्यवधी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर करुन घेते मग शेतकऱ्यांना मदत का होत नाही. शेतकऱ्यांचा, सर्व सामान्य जनतेचा या सरकारवर विश्वासच राहिलेला नाही, हा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज आहे, असे पटोले म्हणाले आहेत.
अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत असे मंत्री सांगतात पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. एक रुपयात वीमा अशी सरकारने घोषणा केली आहे, त्याबाबतचे निवेदनही होणे गरजेचे आहे. मदतीसंदर्भात सरकारची भूमिका सुस्पष्ट असायला हवी अशी कांग्रेसची भूमिका आहे. यावेळी वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला.