Latest Marathi News
Ganesh J GIF

शेतकऱ्यांला कांद्याने रडवले! शेतकऱ्यांवर पदरमोड करण्याची वेळ

संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडला रद्द, कांद्याला अनुदान देण्याची मागणी

सोलापूर दि २७(प्रतिनिधी) – राज्यात कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देशातील बेभरवशी निर्यात धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याला तर १० पोते कांदे विकल्यानंतर सर्व खर्च वजा करुन व्यापाऱ्याने फक्त दोन रूपये दिले होते. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे.

कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. हा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा सोलापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एका शेतकऱ्याने १७ पिशवीतील ८२५ किलो कांदा विकला,त्यानंतरही त्याला आपल्याच खिशातील एक रुपया द्यावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंडू भांगे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने एस. एन. जावळे या कांदा अडत वापऱ्याकडे तब्बल १७ पिशवी कांदा आणला होता.हे कांद्याचे वजन ८२५ किलो भरले. याला भाव फक्त एक रुपयाचा मिळाला, त्यामुळे ८२५ रुपये पट्टी मिळाली. त्यातून हमाली, तोलारी, गाडी भाडे सगळे मिळून ८२६ रुपये झाले. त्यामुळे सतरा पिशव्या कांद्या विकल्यानंतरही बंडू भांगे यांना पदरचा एक रुपया आडत्याला देण्याची वेळ आली. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली असुन सरकारी धोरणावर टिका केली जात आहे. कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच आहे.याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान शेतकऱ्याला २ रुपयांचा चेक देणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाना रद्दची कारवाई केली आहे.

कमी झालेल्या कांदा भावाच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समितीमध्ये उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत संताप व्यक्त केला आहे. शासन जोपर्यंत कांद्याला अनुदान जाहीर करत नाही तोपर्यंत लिलाव चालू होऊ देणार नाही अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!