शेतकऱ्यांनो! ‘जात’ सांगितली तरच खते मिळणार
पॉस मशिनवर विचारली जात आहे 'जात', नव्या फतव्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते. हे अनुदान देण्यासाठी तीन-चार वर्षांपासून ई-पॉस मशिन यंत्रणा कार्यरत आहे.
गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशीन या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पद्धतीचे अपडेटस् आले आहेत. खत घेताना दुकानदारांकडून जातीची विचारणा होत आहे. पण खते घेण्याचा आणि जातीचा काय संबंध असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आमची जात शेतकरी असे शेतकरी सांगत आहेत. पण जात सांगितल्याशिवाय खते मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. एकीकडे जाति निर्मुलनाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे मात्र जात नाही ती जात असा अनुभव सध्या शेतकऱ्यांना येत आहे. नव्या अपडेटमुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडत आहेत. नव्या सॉप्टवेअरमध्ये जातीची माहिती कशासाठी घेतली जात आहे. याची कोणतीही माहिती दिली नाही. तशा सूचना अथवा मार्गदर्शनही आले नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. तर खत घेताना जातीची विचारणा करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. तातडीने ते थांबविण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
शेतकर्यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशीन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यासाठी शेतकर्यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे.