शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस
देवेंद्र फडणवीसांचा पंचामृत ध्यास, विरोधकांडुन मात्र सविस्तर चिरफाड
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषण केले.
अर्थसंकल्पात अनेक योजनांचा सामावेश करण्यात आला आहे. यात शेतक-यांनापासुन महिलांपर्यंत आणि मेट्रोपासून स्मारकापर्यंत अनेक योजनांची घोषणा केली आहे. आज तुकाराम बीज. जगदगुरु तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन । ज्याची आस करी जन ॥’ या तत्वास अनुसरुन अर्थसंकल्प”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. या अर्थसंकल्पात १) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी,२) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, ३) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, ४) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा ५) पर्यावरणपूरक विकास या ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर पडणार असुन राज्यातील शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रूपये भेटणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा मिळणार आहे. त्याचबरोबर अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. नवीन अर्थसंकल्पात राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापुढे महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. त्याचबरोबर मेट्रो, रेल्वे, स्मारक यासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे.
शिंदे सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी जोरदार टिका केली आहे.अजित पवार यांनी या बजेटच्या टिका करताना राज्य कर्जाच्या खाईत असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प मांडला. अख्ख्या अर्थसंकल्पात शब्दांचे इमले बांधले आणि जनतेला स्वप्नात फिरवून आणलं. अशा शब्दात समाचार घेतला आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही हा अर्थसंकल्प म्हणजे गाजराचा हलवा असल्याची टिका केली आहे.