ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला
अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, डंपर चालकाला ओमराजेंनी पकडले, घातपात की अपघात? तपास सुरु
धाराशिव दि १०(प्रतिनिधी)- धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी गावालगतच ही घटना घडली आहे. यानंतर या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनेमागे घातपात तर नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी ७ वाजता मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. व्यायाम करून घरी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परचा त्यांना आवाज आला. खासदार निंबाळकर यांनी पाठीमागे वळून पाहिले तर डंपर मोठ्या वेगाने त्यांच्या दिशेने येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. तो त्याची डावी बाजू सोडून उजव्या बाजूने येत असल्याने ओमराजे निंबाळकर यांनी रोडच्या खाली उडी मारली. तेव्हा डंपर पुढे निघून गेला. डम्पर पुढे निघून गेल्यानंतर ओमराजे यांनी पाठीमागून येत असलेल्या मोटरसायकलकडे लिफ्ट मागितली आणि त्यानंतर त्यांनी डम्परचा पाठलाग करुन रेल्वे गेट परिसरात त्याला गाठले. डंपर चालकाला खासदार निंबाळकर आणि गावातील ग्रामस्थांनी जाब विचारल्यास त्याने त्याचे नाव रामेश्वर बंडू कांबळे राहणार अंबाजोगाई जिल्हा बीड असं सांगितलं. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेची फिर्याद ढोकी पोलिसांत दिली असून ढोकी पोलिसांत डंपर चालक रामेश्वर कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याति आला आहे. डंपरचा क्रमांक MH ४४ K ८८४४ आहे. हा प्रकार चालकाच्या चुकीमुळे झाला? की यामागे काही घातपाताचा हेतू होता का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान ०३ जून २००६ रोजी ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर १६ ऑक्टोंबर २०१९ रोजी चाकू हल्ला करण्यात आला होता. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यात ही घटना घडली होती. या हल्ल्यात उद्धव ठाकरे गटाचे खासदार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हाताला दुखापत झाली होती. आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ पाडोळी येथे चाकू हल्ला झाला होता.