
अखेर ठरल! राहुल गांधीनी केली महत्वाची घोषणा
रद्द झालेल्या खासदारकीबाबत होणार फैसला, बघा राहुल गांधी काय करणार?
दिल्ली दि २(प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मानहानीच्या खटल्यातील त्यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणार आहेत. ते सोमवारी गुजरातला पोहोचणार असून सुरतच्या सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. ११ दिवसांपूर्वी मोदी आडनाव प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे.
सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने राहुल गांधींना तत्काळ जामीन मंजूर करताना शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती दिली असतानाही लोकसभा सचिवालयाने तत्परतेने कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. आता या शिक्षेला राहुल गांधी आव्हान देणार आहेत. राहुल गांधी सोमवारी सुरत कोर्टात पोहोचू शकतात. सीजेएम न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ते जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत. यावेळी हजारो काँग्रेस कार्यकर्ते न्यायालयाच्या बाहेर उपस्थित राहणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधींचे स्वागत करतील. गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासोबत राहू शकतात. जी काही कागदपत्रे तयार करायची होती, ती तयार केली आहेत, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. दरम्यान चार वेळा खासदार राहिलेले राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती न दिल्याशिवाय त्यांना आठ वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास प्रतिबंध केले जाईल. आता पाटणा कोर्टानेही राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीच्या प्रकरणात समन्स बजावले असून येत्या १२ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींवर ‘मोदी आडनाव’वर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुजरातचे भाजप आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी गेली आहे.