महाराष्ट्रातील चार खासदारांचा देशाच्या संसदेत डंका
संसदरत्न पुरस्काराची घोषणा, देशातून १३ जणांची निवड,वाचा संपूर्ण यादी
दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- संसदरत्न पुरस्कार २०२३ साठी देशभरातील १३ खासदारांना नामांकन जाहीर झालं आहे. आठ लोकसभा आणि पाच राज्यसभा खासदारांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादी व भाजप खासदारांचा समावेश आहे.

लोकसभेतील खासदारांना नामांकन मिळालेल्या नेत्यांमध्ये भाजपचे बिद्युत बरन महतो, डॉ सुकांत मुजुमदार, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, कुलदीपराय शर्मा, विजयकुमार गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.तर राज्यसभेत नामांकन मिळालेल्या नेत्यांमध्ये सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीचे फौजिया खान, सपाचे विश्वंभर निषाद, काँग्रेसच्या छाया वर्मा त्याचबरोबर लोकसभेच्या वित्त समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा आणि परिवहन पर्यटन आणि सांस्कृतीक समितीचे अध्यक्ष विजयसाई रेड्डी यांच्या नावाचाही यात समावेश आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती. लोकसभेचे ५४४ आणि राज्यसभेच्या २५४ खासदारांपैकी एका संसदरत्नाची निवड केली जाते. त्यासाठी काही निवडक नावे जाहीर केली जातात. यासाठी संसदेतील खासदारांची उपस्थिती, त्यांनी मांडलेली विधेयके, चर्चेतील सहभाग आदी विविध मुद्यांचा विचार करून खासदारांना नामांकन दिले जातात. निवड झालेल्यांना २५ मार्चला हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील चार खासदारांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केरळमधील रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे एन.के. प्रेमचंद्रन आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसद विशिष्ट रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.