धनगर आरक्षावरुन राधाकृष्ण विखे-पाटीलांवर उधळला भंडारा
धनगर आरक्षणाचा मुद्दा एैरणीवर, त्या कार्यकर्त्यास भाजप शहराध्यक्षांकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
सोलापूर दि ७(प्रतिनिधी)- राज्यात आरक्षणावरुन रणकंदन होत आहे. मराठा समाजावर लाठीहल्ला केल्यानंतर मराठा समाज चांगलाच संतप्त झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. त्यामुळे ओबीसीमधून या निर्णयाला विरोध केला जात आहे. पण आता सोलापूरात धनगर समाज आरक्षणावरुन चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यातच आता धनगर कार्यकर्त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला आहे.
सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. एक निवेदन दिल्यानंतर हा भंडारा उधळण्यात आला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शंकर बंगाळे असे या धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी धनगर कृती समितीचे काही पदाधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी गेले. विखे पाटील हे निवेदन वाचत असताना त्यानं खिशातून एक पुडी काढून त्यातला भंडारा विखे पाटलांच्या डोक्यावर ओतला.त्यामुळे विखे पाटील यांच्या अंगावर संपूर्ण हळद पसरली. हा प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे. पण यावेळी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे व इतरांनी आक्रमक होत बंगाळे यांना मारहाण केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. अखेर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पण या प्रकरणामुळे आता धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील धनगर समाजाचा समावेश एसटीमध्ये करण्यात यावा, यासाठी अनेक वर्षांपासून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. फडणवीस यांनी भाजपचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. त्यामुळे धनगर समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.