Latest Marathi News
Ganesh J GIF

फुरसुंगी कचरा डेपो समस्या पुन्हा डोके वर काढतेय

तातडीने उपाययोजना करण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) – पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरील फुरसुंगी येथील पुलावरील वाहतूक कोंडी तुलनेने बरीच कमी झाली याचा आनंद आहे. तथापि या भागातील कचरा डेपोमधून पुन्हा एकदा दुर्गंधी येऊ लागली आहे. याशिवाय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू झाले असून परिसरात धुराचे लोट उठू लागले आहेत, तरी पुणे महापालिकेने यावर तातडीने उपाययोजना करून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 

सुप्रिया सुळे यांनी आज याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे. फुरसुंगी येथील अरुंद पुलामुळे याठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. अलीकडेच काही दिवसांपूर्वी मंतरवाडी येथील उड्डाण पुलावर स्वतः सुप्रिया सुळे यांनी भल्या सकाळीच रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन केले होते. त्यानंतर आवश्यक कामे झाल्याने सध्या येथील वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली आहे, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचवेळी कचरा डेपोची समस्यां पुन्हा डोके वर काढत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले आहे.

फुरसुंगी येथील पुलाची पाहणी करत असताना त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी या भागात कचऱ्याच्या दुर्गंधीची समस्या सतावत असल्याचे नागरीकांनी सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे. कचरा डेपोवर कॅपिंग केल्यापासून येथील दुर्गंधी कमी झाली होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या परिसरात कचऱ्याची भीषण दुर्गंधी येऊ लागली आहे. याशिवाय येथील कचरा डेपोमध्ये पुन्हा कचरा जळण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. त्यामुळे या परिसरात सर्वत्र धूर पसरलेला असतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही समस्या पुन्हा डोके वर काढणे हे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे, तरी पुणे महापालिकेने तातडीने यावर उपाययोजना करुन नागरीकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!