Latest Marathi News
Ganesh J GIF

मला मंत्रीपद द्या नाहीतर माझी बायको आत्महत्या करेल

शिंदे गटातील आमदारांची मंत्रिपदासाठी शिंदेना अनोखी धमकी, ते तीन मंत्री कोण?, रंगली जोरदार चर्चा

रायगड दि १७(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदारांची मंत्रीपदाची आस अजीजी संपलेली नाही. पण अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागामुळे अनेक आमदारांचे मंत्रीपदाचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. पण आता काही आमदार मंत्रीपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे यांना आमदारांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार आहेत. पण आता काही आमदार आपले मंत्रीपद कसे हुकले याचे किस्सा सांगताना दिसत आहेत.

शिंदे सरकार स्थापन होऊन आता सव्वा वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अनेक आमदार मंत्रीपदाचा प्रतिक्षेत आहेत. पण आता अजित पवार सत्तेत सामील झाल्यावर अनेकांचे मंत्रीपदाचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. मंत्रिपदाच्या रांगेत असलेले नाराज आमदार भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपला पत्ता कसा कट झाला याचा किस्सा सांगितला आहे. अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी बुधवारी आमदार गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार गोगावले यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत, आम्ही मात्र मंत्रीपदापासून दुर आहोत असे विधान केले आहे. त्याचबरोबर काही आमदारांनी एकनाथ शिंदेना मंत्री होण्यासाठी कशा हटके धमक्या दिल्या होत्या असे सांगितले आहे. या विषयी बोलताना ते म्हणाले की, पहिल्या नऊ जणांच्या यादीत मंत्रीपद मला मिळणार होते, मात्र आमच्यातल्या एका सहकारी आमदाराने सांगितले की मला मंत्रीपद दिले नाही तर माझी बायको आत्महत्या करेल, एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाही, माझं राजकारण संपवतील, तिसरा म्हणाला मला मंत्रिपद मिळाले नाही तर शपथविधी नंतर लगेच मी राजीनामा देतो, या सगळ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अडचणीत आले, त्यामुळे मला मंत्रिपदासाठी थांबावे लागले. असे सांगितले आहे. त्यामुळे ते तीन मंत्री कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.

सुरत-गुवाहाटी-गोवा- मुंबई असा प्रवास शिंदे गटातील आमदारांनी केला होता. त्यावेळी आमदार गोगावले यांनी साथ देत महत्वाची भूमिका पार पाडत होती. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. आता देखील मंत्रीपदाबरोबरच रायगड पालकमंत्री पदासाठी ते उत्सुक आहेत. पण त्यांना मंत्रीपद मिळणार का? याची उत्सुकता कायम आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!