Latest Marathi News
Ganesh J GIF

दोन दिवसांत विकास निधी द्या अन्यथा न्यायालयात जाऊ

काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा, ते कार्यालय हटवण्याची मागणी

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आमदारांना विकास निधी देताना काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर अन्याय झालेला आहे. विकास निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त प्रमाणात वाटण्यात आला आहे तर काँग्रेसच्या आमदारांना अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना निधीचे वाटपही झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदारांना विकास निधी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विकास निधी नाही दिला तर मात्र काँग्रेस न्यायालयात धाव घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात भेट घेऊन विकास निधीबाबात चर्चा केली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, निधी वाटपात असमानता झाली आहे. काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघासाठी विकास निधी मिळाला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मंजूर केलेल्या विकास कामांना सरकारने स्थगिती दिलेली आहे ती स्थगितीही उठवावी अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन विकास निधीवर निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले आहे. काँग्रेस पक्ष दोन दिवस वाट पाहणार आहे. दोन दिवसात निधी मिळाला नाही तर कोर्टात धाव घेऊ. असा इशारा दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कार्यालय स्थापन केले आहे. पालकमंत्र्यांचे हे कार्यालय तात्काळ बंद केले पाहिजे. मुंबई महानगर पालिकेत पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरु करुन भाजपाने नवीन परंपरा सुरु केली आहे ती चुकीची आहे. महानगर पालिका स्वायत्त संस्था आहे, तेथे पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरु करून भाजपा राजकारण करत आहे, हे थांबवले पाहिजे, अशी मागणीही काँग्रेस पक्षाने केली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!