दिवाळीआधी शिंदे फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना गुड न्यूज
राज्य सरकारने केली इतक्या कोटींची कर्जमाफी, शेतकऱ्यांना दिवाळी भेट
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून जवळपास ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल तसेच भू-विकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले सरकारच्या या निर्णयामुळे दिवाळीच्या आधीच भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४,७८८ कर्जदार शेतकऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना सांगितले आहे.
याशिवाय भूविकास बँकांच्या २४ जिल्ह्यातील ४० मालमत्ता सहकार विभागाच्या ताब्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये भाड्याच्या जागेत असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वत:ची जागा मिळणार असून या कार्यालयांच्या भाड्यापोटी होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 69 हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे.