
पुणे महापालिकेत सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील अंतर्गत वाद कमालीचा चिघळला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास टिंगरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत भाजपच्या नेतृत्वाखालील स्थायी समितीवर राष्ट्रवादीच्या प्रभागांतील विकासनिधी सूडबुद्धीने रोखल्याचा आणि वळवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

१२ कोटींचा निधी वळवला; संघर्षाची मुख्य कारणे

निधी कापल्याने धुसफूस: राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे (प्रभाग २-डी) आणि अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील तब्बल १२ कोटी रुपयांचा विकासनिधी अर्थसंकल्पातून काढून भाजप नगरसेवकांच्या प्रभागात वळवण्यात आला.या अन्यायाविरोधात शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने महापालिकेच्या मुख्य इमारतीत तीव्र निदर्शने केली.याआधी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि सरकारी उपक्रमांवर सातत्याने चिखलफेक करत असल्याचा आरोप बिडकर यांनी केला होता.अमोल बालवडकर यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील विकासकामांच्या ऑडिटची मागणी केल्याने भाजप नेते कमालीचे संतप्त झाले आहेत.

“मैत्री राज्यात, पुण्यात नाही!”
राज्यात महायुतीचे सरकार एकदिलाने काम करत असताना पुणे महापालिकेत मात्र भाजपने दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून करदात्या नागरिकांच्या पैशांचा सन्मान करावा आणि निधीचे वाटप समान न्यायाने करावे, अशी मागणी केली आहे.

