
मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी मराठीत एक म्हण आहे. याचा प्रत्यय आज पहायला मिळाला. महाविकास आघाडीचे सरकार असताना संसदीय कार्यमंत्री राहिलेले अनिल परब विरोधकांच्या पत्रकार परिषदेत एका कोपऱ्यात बसलेले पहायला मिळाले या फोटोची जोरदार चर्चा होत आहे.
ठाकरे सरकार गेल्यापासून शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे प्रवक्तेपदाची जबाबदारी सध्या अरविंद सावंत आणि विनायक राऊत संभाळत आहेत. पण शिवसेनेचे महत्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अनिल परब मात्र फारसे भाष्य करत नाहीत. परब यांना त्यांच्या रिसाॅर्टच्या मुद्यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अडचणीत आणले आहे.त्यात भर म्हणजे परब लवकरच जेलमध्ये जाणार अशी विधाने सोमय्या करत असतात. त्यामुळे परब माध्यमांसमोर येण्याचे टाळत आहेत. त्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद अनिल परब यांना डावलून भाजपातून आलेल्या अंबादास दानवे यांना देण्यात आल्याने आजच्या पत्रकार परिषदेप्रमाणे पक्षातूनही अनिल परब साईडलाईन झाले आहेत का अशी चर्चा रंगली आहे. पण अनिल परब मातोश्रीच्या जवळचे म्हणून ओळखले जातात तरीही विरोधी पक्षनेतेपदापासून का लांब ठेवले यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याआधीची सारी छाननी अनिल परब करायचे. त्यांनी एनओसी दिल्यानंतरच ठाकरे स्वाक्षरी करायचे. तसेच महत्वाच्या निर्णयात देखील त्यांचा सहभाग असायचा पण आता त्यांची जागा कोप-यात गेली आहे.