
दसरा मेळाव्यासाठी ‘विचारांचा वारसा’ विरुद्ध ‘संघर्षाचा वारसा’
शिंदे ठाकरे गटाकडून पोस्टर्स वाॅर, दोन्ही गटांकडून 'याची' खबरदारी
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपणच खरी शिवसेना हे दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची पोस्टर्स जारी करण्यात आली आहेत.तर ठाकरेंकडूनही पोस्टर्स झळकवण्यात आली आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन दोन्ही गटात पोस्टर्सवाॅर सुरू असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची दोन पोस्टर्स जारी करण्यात आली आहेत. एका पोस्टरवर ‘आम्ही विचारांचे वारसदार’ तर दुसऱ्या पोस्टरवर ‘हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो आहे. तर ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ असाही उल्लेख करत धनुष्यबाण चिन्ह छापण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडून एक व्हिडीओही प्रदर्शित करण्यात आला आहे.त्यात शिवसैनिकांना अपील करण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज वापरण्यात आला आहे. ठाकरे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी पोस्टर जारी करण्यात आले आहे. ‘काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे’ अशा पद्धतीचे पोस्टर मातोश्रीच्या परिसरात लावण्यात आले आहे.’वाजतगाजत गुलाल उधळत शिस्तीने या चला शिवतीर्थावर’ असा ‘आदेश’ उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांनी दिला आहे. दसरा मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होणार आहे, तर शिवसेनेचा दसरा मेळावा पारंपारिक शिवतीर्थावर होणार आहे. दोन्ही कडून तीन ते पाच लाख शिवसैनिक मेळाव्याला येतील या दृष्टीने नियोजन केले जात आहे. दोन्ही बाजूंनी वारसा आमचाच असल्याचे सांगण्यात आले आहे. विचारांचा वारसा वरचढ ठरणार की संघर्षाचा वारसा यश मिळवणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.पण सध्या तरी पोस्टर्स वाॅर जोरकसपणे सुरु आहेत.