किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची डोक्यात दगड घालत हत्या
हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत बसून राहिला पती, आरोपी पती अटकेत, पोलिसांना वेगळाच संशय
जयपूर दि २३(प्रतिनिधी)- पती पत्नीत छोटे मोठे वाद कायमच होत असतात. पण याच वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार राजस्थानमधील जोधपूरमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर पती ७ ते १० तास मृतदेहासोबतच बसून होता. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
सुमन बेनीवाल असे मृत महिलेचे नाव आहे. तर रमेश बेनिवाल असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. विशेष म्हणजे सुमन ह्या राष्ट्रीय लोकशाही पक्षाच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष होत्या. तसेच पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. मिळालेल्या माहितीनुसार सुमन बेनिवाल या पेट्रोल पंपावर काम करत होत्या. पती रमेश बेनिवाल यांच्यासोबत त्या भाड्याच्या खोलीत राहत होत्या. घटनेच्या दिवशी रात्री रमेश बेनिवाल घरी पोहोचले तेव्हा त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. पण सुमन यांनी दरवाजा उघडला नाही. पहाटेच्या वेळेस सुमन यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर दरवाजा उघडताच दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. त्यामुळे रागाच्या भरात रमेशने सुमनच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. कमाल म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने सुमनच्या भावाला फोन करत तुझ्या बहिणीचा खून झाला आहे, सकाळी येऊन मृतदेह घेऊन जा, असे सांगितले. घाबरलेल्या भावाने तात्काळ याची माहिती पोलीसांना दिली. विशेष म्हणजे पोलीस आणि कुटुंबीय येईपर्यंत रमेश सुमनच्या मृतदेहासोबतच बसून होता. पोलीस आल्यानंतर रमेशने दरवाजा उघडला. पोलीसांनी रमेशला अटक केली आहे. या हत्येमागचे खरे कारण पोलीस तपासत आहेत. या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे.
सुमन स्थानिक राजकारणात कायम सहभागी असायच्या पक्षातील वरिष्ठांपर्यंत त्यांची ओळख होती. त्यांच्या वाढदिवसादिवशी खासदार हनुमान बेनिवाल यांनी सुमन यांच्या घरी जात शुभेच्छा दिल्या होत्या. रमेश देखील छोटासा व्यवसाय करत होते. त्यांची दोन मुले वसतिगृहात शिकत होती. हत्येमागचे खरे कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.