
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करणाऱ्या आरोपी पतीला बावधन पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत कर्नाटकातून बेड्या ठोकल्या आहेत. निलाबाई परशुराम हरिजन (वय ४२, रा. तोडकर वस्ती, भुगाव, बावधन) असे खून झालेल्या दुर्दैवी पत्नीचे नाव असून, परशुराम भामण्णा हरिजन (वय ४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

चारित्र्याच्या संशयातून निर्घृण हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम याने पत्नी निलाबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात निलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र लपवून ठेवले आणि तात्काळ घटनास्थळावरून पोबारा केला.

शेतात लपला होता आरोपी, पोलिसांचा गनिमी कावा
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चक्रावून आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी कर्नाटकात पळून गेल्याचे स्पष्ट होताच बावधन पोलिसांची दोन विशेष पथके तात्काळ कर्नाटकाकडे रवाना करण्यात आली. कर्नाटकातील विजापूर येथे आरोपी एका शेतात लपून बसला होता आणि तेथूनही पुढे पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने बावधन पोलिसांच्या पथकाने त्याला चोहोबाजूने घेरून ताब्यात घेतले.
पोलीस पथकाची उल्लेखनिय कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, प्रदीप जाधव, आणि पोलीस उपायुक्त विठ्ठल कुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार, चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे व त्यांच्या तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

