ठरल तर! राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार?
मनसेच्या बैठकीत महत्वाचा ठराव?, राज ठाकरेंचा दादुसकडे टाळीसाठी हात, भाजपाची कोंडी?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन मोठं बंड केल्यानंतर आता राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता राज्यात नवे समीकरण जन्माला येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. तर आता मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असे बॅनर्स लागले आहेत. त्या बॅनर्समध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दोन्ही नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. या बॅनर्समध्ये राज साहेब आणि उद्धव साहेब आता तरी एकत्र या संपुर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहत आहे. अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला असता, राज ठाकरे यांनी सुचक विधान केले आहे. मी लवकरच मेळावा घेणार आहे, त्यात सर्व काही स्पष्ट करेल’ असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान मनसेच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया असा सूर उमटल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, शिवसेना फुटली आणि भाजपासोबत गेली. त्यानंतर कुठेतरी ठाकरे ब्रँड कायम राहावा यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. याआधी देखील अनेकदा ठाकरे बंधुना एकत्र येण्यासाठी अनेकदा विनंती, मागण्या करण्यात आल्या होत्या. पण अनेकवेळा तो असफल ठरला आहे. त्यामुळे राज उद्धव एकत्र येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शंका व्यक्त केली आहे. पटेल आणि भुजबळ यांना पाठवल्याशिवाय ते जाणार नाहीत, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही, यांना मतदारांशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.