‘तुला बोलायचे नसेल तर दुसरी मुलगी पाहून दे’
पुण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
पुणे दि २०(प्रतिनिधी)- सार्वजनिक रोडवर सायकल शिकत असलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिला सातत्याने फोन करत आणि व्हॉटसअॅपवर मेसेज करत तुला माझ्यासोबत बोलायचे नसेल तर चालेल, मला दुसरी मुलगी पाहून दे, अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडक पोलिसांनी सोहेल सय्यद याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची १६ वर्षाची मुलगी सार्वजनिक रोडवर सायकल शिकत असताना सोहेल आणि त्याचा मित्र दुचाकीवरुन तिच्या पुढे मागे फिरुन तिला त्रास देत होता. पुढे जात त्याने मोबाईल क्रमांक मिळवून सतत फोन करत त्रास देऊ लागला. तसेच व्हॉटसअॅप मेसेजही करू लागला. मात्र, फिर्यादीच्या मुलीने त्याला कधी प्रतिसाद दिला नाही. अचानक एके दिवशी फिर्यादीच्या घरात कोणी नाही हे पाहून आरोपीने घरात घुसत तुला माझ्यासोबत बोलायचे नसेल तर चालेल, पण मला दुसरी मुलगी पाहून दे, अशी धमकी दिली. या प्रकाराने ही मुलगी घाबरुन गेली. तिने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवार पेठेत मार्च २०२२ ते २९ ऑक्टोबर २०२२ दरम्यन घडला आहे. पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के करीत आहेत.