धक्कादायक! ५०० विवाहित मुली राज्यातून गायब
महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्र्याचा दावा, व्यक्त केली 'ही' भीती
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- लग्न झालेल्या ५०० मुली राज्यातून गायब झाल्याचा धक्कादायक दावा पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. त्याचबरोबर मुंबईत एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सुरू आहे. हे असेच चालू राहिले तर मुंबईचा अफगाणिस्तान, काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही लोढा यांनी दिला आहे.

भाजपच्या वतीने मलबार हिल येथे आयोजित जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोढा म्हणाले की,”लग्नानंतर ज्या मुलींचा आपल्या मूळ कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. त्यांची सध्या काय परिस्थिती आहे? तसेच आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्या एका व्यक्तीसोबत निघून गेल्या आहेत. ज्यामुळे आपल्या कुटुंबीयांकडे त्या तक्रारही करू शकत नाहीत. ज्या व्यक्तीसोबत त्या निघून गेल्या आहेत, त्या व्यक्तीला माहित आहे की, या मुलींना त्यांच्या कुटुंबीयांचा पाठिंबा नाही.आपण श्रद्धा वालकर प्रकरणातून पाहिले आहे. अशा मुलींना मदत करता यावी म्हणून मी एक विशेष पथक नेमण्याचे निर्देश दिले आहेत’ असे देखील लोढा म्हणाले आहेत.यावेळी गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असून शिवसेनेने मुंबईसाठी काय केले? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
लव्ह जिहादमुळे तरुणी बेपत्ता होत असल्याची काही आकडेवारी, माहिती महिला आयोगाच्या बैठकीत तुमच्यासमोर मांडण्यात आली का, असा प्रश्न लोढा यांना विचारण्यात आला. त्यावर, ‘आकडेवारी नाही, मात्र अशी १० ते १२ प्रकरणे माझ्यासमोर आहेत. त्यातही असे काही झालेले असू शकते’, अशी शक्यता लोढा यांनी व्यक्त केली आहे.